Tuesday, January 11, 2011

पण एकच शिवबा

नको राम, नको कृष्ण
नको वराह, नको नरसिंह
नको दशातला एकही
पूजीन तुलाही,
पण एकच शिवबा
तू जन्माला घाल

रक्षीन तो तुलाही
तवस्थापित धर्मालाही
अन तवनिर्मित धरनिलाही
पूजीन तुलाही,
पण एकच शिवबा
तू जन्माला घाल

जुळतील कर तव वंदना
झुकविन मस्तक तव चरणीही
त्याच्या कीर्तीचे पोवाडे
अन सोबत आरत्या तुझ्याही आळवीन,
पूजीन तुलाही,
पण एकच शिवबा
तू जन्माला घाल

धर्म शिकवीन तो
धर्म जगवीन तो
दीना रक्षीन तो
आशा आमच्या पोशीन तो
मानीन तुझेही सामर्थ्य
पूजीन तुलाही,
पण एकच शिवबा
तू जन्माला घाल

तुझ्याही गाथा, तुझ्याही कथा 
सांगीन पुढच्या पिढीत
पुरे आता मत्सर
पूजीन तुलाही,
पण एकच शिवबा
तू जन्माला घाल


- अ. शि. फुंदे

No comments:

Post a Comment