Sunday, January 23, 2011

ती

गालावरच्या खळीत एका
अदा हो लाख उधळल्या
अन तितक्याच लाख जणू
काळ्या  आज फुलल्या

टीचभर थेंब गाली ओघळता
टीचभरच लाली नाकी उतरते
गाल फुगवून ती रुसता
सायंकाळही जरा लवकरच येते

वट डोळ्यावर ढळता
श्वास अलगद घुटमळला
अन लटका हळूच घेता
एक ठोका हृदयी
नक्कीच चुकला

स्पर्श तिचा अलगद होतां
आल्हाद झुळूक, कुठून जणू भिडली
अन लाजळूचीही वेली ही फुलली
ती हरवता स्वतःतच
निरागस अन शांत अशी
जणू क्षितीज्याच्या उंबरठयावर
उभी अबोल सायंकाळ जशी

अन लटका हळूच घेता
एक ठोका हृदयी
नक्कीच चुकला 







Thursday, January 13, 2011

एक क्षण

एक क्षण असाही येतो
जेव्हा ज़ुकाव लागत
बुरुज जरी अभेद्य तू
स्वत:च्याच देहाच्या चिथडया
स्वत: मोजत बासव लगत
एक क्षण असाही येतो
जेव्हा ज़ुकाव लागत

रक्ताने माखलेली समशेर तू
तरी अपमानाच्या म्यानेत
स्वत:च्याच श्वासांना
स्वत:च कोंडाव लागतं

खळखळ गंगा जरी तू
तरी स्वत:च्याच प्रवाहाला
स्वत:च धरण घालाव लागत
एक क्षण असाही येतो
जेव्हा ज़ुकाव लागत

लाखोंचा पोशिंदा जरी तू
तरी एखाद्या राती, उपाशी पोटी
काळोखाला साथ देणाऱ्या
चांदण्या मोजत बसाव लागत
एक क्षण असाही येतो
जेव्हा ज़ुकाव लागते
बुरुज जरी अभेद्य तू
स्वत:च्याच देहाच्या चिथडया
स्वत: मोजत बासव लगत
   - अ. शि. फुंदे

Tuesday, January 11, 2011

पण एकच शिवबा

नको राम, नको कृष्ण
नको वराह, नको नरसिंह
नको दशातला एकही
पूजीन तुलाही,
पण एकच शिवबा
तू जन्माला घाल

रक्षीन तो तुलाही
तवस्थापित धर्मालाही
अन तवनिर्मित धरनिलाही
पूजीन तुलाही,
पण एकच शिवबा
तू जन्माला घाल

जुळतील कर तव वंदना
झुकविन मस्तक तव चरणीही
त्याच्या कीर्तीचे पोवाडे
अन सोबत आरत्या तुझ्याही आळवीन,
पूजीन तुलाही,
पण एकच शिवबा
तू जन्माला घाल

धर्म शिकवीन तो
धर्म जगवीन तो
दीना रक्षीन तो
आशा आमच्या पोशीन तो
मानीन तुझेही सामर्थ्य
पूजीन तुलाही,
पण एकच शिवबा
तू जन्माला घाल

तुझ्याही गाथा, तुझ्याही कथा 
सांगीन पुढच्या पिढीत
पुरे आता मत्सर
पूजीन तुलाही,
पण एकच शिवबा
तू जन्माला घाल


- अ. शि. फुंदे

Monday, January 10, 2011

महापुरातील ते लव्हाळे !

महापुरातील ते लव्हाळे !
हसत होते, जगात होते
देण नाही, घेण नाही
स्वतःबाहेर कसले जग नाही
नदीकाठच्या वडाच्या कुशीतले
महापुरातील ते लव्हाळे !

गोष्ट छोटी त्या लव्हाळ्याची
त्याला खिजवनाऱ्या एका वडाची
त्या इवल्या रूपावर
वड तो हसायचा
शीतल छाया पुरवतो मी
भूषण गर्वित तो बोलायचा
महापुरातील ते लव्हाळे !

त्या दिवशी बांध फुटला होता
पूर मोठा नदीला आला होता
वड काही हटेना
नदी काही हरेना
मोडेन पण वाकणार नाही
वड इरेला आला होता 
झुकेन पण संपणार नाही
एवढंच लव्हाळ सांगत होता

कोण जिंकलं कोण हरलं
काही ऐकल नाही
त्या नदीकाठी मात्र आज
दाखवायला वडाच निशाण नाही
- अ. शि. फुंदे

Sunday, January 9, 2011

महापुरुषांच्या पुतळ्यानो

महापुरुषांच्या पुतळ्यानो
प्रणाम करता करता तुम्हा
हात आता थकलेत
तुमच्या शब्दांचे आचरण जरी नाही
तरी चौकाचौकातल्या सभासभातून
त्यांचे पारायण करता करता
ओठ मात्र सुकलेत
महापुरुषांच्या पुतळ्यानो  !

इतकी वर्षे क्रांती करता करता
यौवनाचे देह आता जिझलेत
रणशिंग फुंकता फुंकता
गळे मात्र कोरडे पडलेत
महापुरुषांच्या पुतळ्यानो !

तुमच एक बर होत
अहिंसेन छान जमत होत
इथे तर वाजवून वाजवून
अहिंसेचे ढोलही आता फुटलेत
महापुरुषांच्या पुतळ्यानो !

प्रकाश देता देता तारेही आता विझू  लागलेत
आशीर्वाद देता देता तर
ईश्वरही आता संपू लागलेत
प्रकाशाकडे पाऊल टाकताच
रस्ते मात्र पायाखालीच संपलेत  
रस्ते मात्र पायाखालीच संपलेत

   -  अ. शि. फुंदे

शब्द बनून

तू कोणत्या रुपात हवीस
यावर मनात द्वंद्व जुंपलय

वाटत, कोसळणाऱ्या श्रावणसरीतून
तुझीही एक सर कोसळावी

चंद्राभोवती नाच धरणाऱ्या चांदण्यात
तुही प्रकाश बनून फुलावीस

वाटत, नभाला भेदणाऱ्या सूर्याचा
किरण बनून तुही पापण्याआड लपावस

टपोऱ्या गुलाबाचा सुगंध बनून
तुही श्वासाश्वासातून नसानसात उतरावस

अन प्रेमाचे गीत गाणाऱ्या ओठांवर
तू स्वर बनून थैमान घालावास

वाटत, जेव्हा जेव्हा लिहीन तुझ्यासाठी
तेव्हा तेव्हा , तू शब्द बनून
माझ्यासाठी जगावस

- अ. शि. फुंदे

dedicated to my sweet wife Archana

देव्हाऱ्यातल्या देवा

देव्हाऱ्यातल्या देवा जरा धरणीवर ये
आमची बी चटणी भाकर
जरा पदरात घे
लाडवाच गोडव सोडून चटणीच तिखट
जरा उदरात घे
देव्हाऱ्यातल्या देवा जरा धरणीवर ये

मोत्याच ओरडण सोडून कोळशाचे रडण
जरा ऐकून घे
सोन्याच्या देवा जरा
काळ्या मातीत लोळण घे
देव्हाऱ्यातल्या देवा जरा धरणीवर ये

चांदीचा गाभारा सोडून
जरा रानाच्या आसऱ्याला ये
फुलाच ओझ फेकून
जरा तू औताला ये
देव्हाऱ्यातल्या देवा जरा धरणीवर ये

धुपाचा गंध सोडून
जरा शेणाचा दर्प तू घे
मागणाऱ्याला वरदान सोडून
आमच्या वेदनेला तुझ्या
आसवांचे दोन थेंब तरी दे
देव्हाऱ्यातल्या देवा जरा धरणीवर ये
जरा धरणीवर ये

- अ. शि. फुंदे